
How To Check Cibil Score: आपण अनेकदा ऐकतो की “आम्हाला बँकेकडून कर्ज मिळत नाही…” पण यामागचं खरं कारण हे अनेकांना माहितीच नसतं. आर्थिक गरज आल्यावर आपण बँकेचा दरवाजा ठोठावतो, पण बँक तुमच्याकडे आधी काय मागते? तर ते म्हणजे तुमचा CIBIL Score. हो, हा एक छोटासा आकडा तुमच्या आर्थिक शिस्तीचं आणि विश्वासार्हतेचं प्रतिबिंब असतो, आणि तोच ठरवत असतो की तुमचं कर्ज मंजूर होणार की नाही ते.
CIBIL Score म्हणजे नेमकं काय?
सिबिल स्कोर म्हणजे तुमचं आर्थिक वर्तन मोजण्याचा एक मापक आहे. जसं की तुम्ही आधी घेतलेली कर्जं वेळेवर फेडली आहेत का, हफ्ते भरले का, तुमचं क्रेडिट कार्डचं वापराचं प्रमाण काय आहे, या सगळ्याचा हिशोब ठेवून CIBIL (Credit Information Bureau India Limited) तुमच्यासाठी एक स्कोअर तयार करत असतं. साधारणतः 300 ते 900 च्या दरम्यान हा स्कोअर ठरवलेला असतो, आणि बँकांना तुमच्याबद्दल खात्री देण्यासाठी तुमचा हा स्कोअर 750 पेक्षा जास्त असणं खूप गरजेचं आहे.
तुमचा स्कोअर किती असावा?
- 750 किंवा त्याहून अधिक: हा एक उत्तम स्कोअर मानला जातो. हा स्कोअर असताना बँक तुम्हाला सहज आणि कमी व्याजदरात कर्ज देते.
- 650 ते 749: हा एक ठीकठाक स्कोअर आहे. हा स्कोअर असताना बँक कर्ज देण्याबद्दल विचार करते, पण कर्ज मंजूर होऊ शकतं.
- 600 पेक्षा कमी: हा धोकादायक झोन ठरू शकतो. इथे बँका कर्ज देताना टाळाटाळ करतात किंवा जास्त व्याज आकारतात.
स्कोअर चांगला ठेवायचा असेल तर हे लक्षात ठेवा
वारंवार कर्जासाठी अर्ज करू नका, प्रत्येक कर्जाचा अर्ज हा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करतो. अनेक अर्ज तुमच्या गरजपेक्षा अधिकच दिसतात, आणि त्यामुळे बँका तुमच्यावे शंका घेतात.
क्रेडिट रिपोर्ट मध्ये चूक आहे का हे तपासा, यासाठी दर काही महिन्यांनी क्रेडिट रिपोर्ट तपासा. कधी कधी चुकीची माहिती नोंद होते, जी स्कोअर कमी करते.
क्रेडिट कार्डचा वापर मर्यादेत ठेवा, जास्त क्रेडिट वापर म्हणजे आर्थिक दबाव असं बँकांना वाटतं. शक्यतो ३० टक्क्यांपेक्षा जास्त लिमिट वापरू नका.
हप्ते आणि बिलं वेळेवर भरा, तुमच्याकडे जर कर्ज आहे, तर त्याचे हप्ते वेळच्या वेळी भरत राहा. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डची बिलंही उशीर न करता भरा.
जास्त व्याज असलेलं कर्ज आधी फेडा, एकाच वेळी अनेक कर्जं घेतलेली असतील, तर सर्वप्रथम जास्त व्याजाचं कर्ज फेडा. यामुळे आर्थिक भार कमी होईल आणि स्कोअर सुधारेल.
CIBIL Score चेक कसा करायचा?
- जर तुम्ही पहिल्यांदाच स्कोअर तपासत असाल, तर खालील स्टेप्स फॉलो करा,
- CIBIL ची अधिकृत वेबसाइट (https://www.cibil.com/) वर जा.
- इथे तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल वगैरे माहिती भरा.
- त्यानंतर ओटीपीच्या माध्यमातून तुमचं व्हेरिफिकेशन करा.
- एकदा इथे अकाउंट तयार झालं की, तुम्हाला तुमचा स्कोअर दिसेल.
- बाजारात TransUnion, Experian, Equifax यांसारख्या इतर क्रेडिट एजन्सीदेखील आहेत ज्या तुम्हाला स्कोअर दाखवतात.
कमी स्कोअर असेल तर चिंता करू नका
सिबिल स्कोअर कमी असेल, तरीही सुधारण्यासाठी खूप काही करता येतं. थोडीशी शिस्त, थोडं संयम आणि योग्य नियोजन केल्यास काही महिन्यांत तुमचा स्कोअर चांगला होऊ शकतो.